माझी भाची मोठ्या तावातावात बोलत होती, 'खरं सांग आत्या, हे असं बोलणं तुला शोभलं का? मला तरी मुळीच नाही आवडलं.' मी तिला शांत करत विचारले, 'अगं, इतकी का चिडतेस? तुलाच त्रास होईल. काय झालंय ते नीटपणे सांग बरं.' तेव्हा ती म्हणाली, 'बघ ना! एवढी मोठी माणसं, पण कशी भाषा वापरतात. तुमच्या परीनं तुमचं म्हणणं बरोबर असेलही; पण ते नीट सांगायचं. किती वाईट शब्दांत बोलत होते.'
मी थोड्या वेळात तिची समजूत काढली. पण मग मनात विचार आला, आपले म्हणणे योग्य शब्द वापरून ते दुसऱ्यापर्यंत न दुखावता पोहोचवणे इतके कठीण असावे का? विचार करता करता मी 'शब्द' या शब्दाशी येऊन थांबले. आपण आपले विचार आणि भावना व्यक्त करण्यासाठी शब्दाचे माध्यम वापरत असतो. मग त्याचे स्वरूप तोंडी असो वा लेखी. तुमच्यासाठी योजलेला शब्द चांगला की वाईट, योग्य की अयोग्य, हे तो ज्या प्रकारे उपयोगात आणलेला असेल त्यावरून ठरते. याबाबतीत आपल्या 'योगसंग्राम' या रचनेत शब्दमहिमा वर्णिताना श्रेष्ठ संतकवी शेख महंमद म्हणतात, 'शब्द वायुहुनि हळुवट। शब्द तो शस्त्राहुनी तिखट।। शब्द ध्रृवाहुनि घनवट। सत्यार्थ बोलिता वचन।।' शब्द कधी वाऱ्याच्या मंद झुळुकीपेक्षा हळुवार, मुलायम असतात, तर कधी ते एखाद्या शस्त्रापेक्षा तीव्र वार करण्याइतके तीक्ष्ण असू शकतात. त्यांचे स्थान ध्रृवापेक्षा अढळ आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
संघर्ष कोणताही असो; दोन व्यक्तींमधला वादविवाद, हाणामारी असो किंवा अगदी दोन देशांमधली लढाई किंवा महायुद्ध असो; अखेर तो मिटवताना शब्दांचाच आधार घ्यावा लागतो. याबाबतीत शेख महंमद म्हणतात, 'शस्त्रे राजकारणे चालती। शब्दे मान्यता चढे।।' संघर्षात कोण यशस्वी झाले हे तहाच्या कलमांतले शब्द किती तोलून मापून वापरले आहेत, त्यावरून ठरते. नाहीतर आमच्याकडे म्हण आहे, 'युद्धात जिंकले अन् तहात हरले.' म्हणजेच शस्त्रांनी विजय मिळवला तरी त्याच्यावर शब्दांनीच शिक्कामोर्तब होते. त्या यशाला मान्यता मिळते.
आपण विचारविश्वात कितीही भ्रमंती केली, तरी त्याला मूर्तरूप येण्यासाठी शब्दांचा आधार लागतोच. शब्दकळेची कितीतरी रूपे विविध प्रकारच्या रचनांमधून प्रकट होतात. शब्दांचे सामर्थ्य रचनेला अर्थवाही बनविते. त्यातून अनेक गद्य आणि पद्य प्रकारांची ग्रंथनिर्मिती होते. साहित्यसाधनेचा तो मूलभूत आधार आहे. समाजाच्या जडणघडणीमध्ये ग्रंथांचे फार मोठे योगदान असते. त्यातले विचारधन समाजाला दिशा देत असते. जेव्हा त्या शब्दरूपाला कलात्मक पातळी प्राप्त होते, मूल्यांचा आधार लाभतो, प्रज्ञा आणि प्रतिभेची जोड मिळते, तेव्हा तर त्यातून अभिजात साहित्य निर्माण होते. इतके सामर्थ्य असलेले शब्द जबाबदारीने वापरणे आवश्यक नाही का?
प्रमिला जरग