Quantcast
Viewing latest article 9
Browse Latest Browse All 47

वैफल्य आणि आनंद

आपल्याला मिळणारी प्रत्येक गोष्ट सर्वांत चांगली असावी, अशी प्रत्येक व्यक्तीची अपेक्षा असते. त्यासाठी वाट्टेल तेवढे कष्ट करण्याची, योग्य संधीची वाट पाहण्याची काहीजणांची तयारी असते. पण आयुष्यात प्रत्येक वेळी सर्वच मनासारखे घडते असे नाही. ऱ्याच वेळा भरपूर प्रयत्न आणि वेळ खर्च करूनही हवे ते मिळतेच असे नाही. कधी कधी ते मिळते; परंतु त्यात इतका काळ गेलेला असतो की, ते प्रत्यक्षात हाती पडते तेव्हा त्याचा आस्वाद घेण्याची वेळ आणि शक्ती निघून गेलेली असते. शिवाय अधिकाधिक चांगले काहीतरी मिळवण्याच्या नादात हातात असलेले निसटून जाण्याची मोठी शक्यता असते.

या संबंधात ऐकलेली एक गोष्ट आठवते. एक अतिशय गुणी आणि कष्टाळू चित्रकार होता. बरीच वर्षे नेहमीची चित्रे काढून झाल्यावर एके दिवशी त्याच्या मनात आले की, आपण आता असे एक चित्र काढायचे की, तसे जगात कुठेही नसेल.

एकदा हे मनाशी पक्के ठरवल्यावर तो तयारीला लागला. आता अद्वितीय चित्र काढायचे, तर त्याला लागणारे सारे काही सर्वोत्तम हवे. तेव्हा तशी सामग्री गोळा करणे सुरू झाले. सर्वप्रथम त्याने योग्य अशी निवांत जागा शोधली. तेथे सर्व उत्तम साधनांनी युक्त अशी चित्रशाळा उभारली. उत्तमोत्तम रंग आणि लागणारे अन्य साहित्य मिळवण्यासाठी देश-परदेशांतील बाजारपेठा पालथ्या घातल्या. त्यासाठी जगभर प्रवास केला. अमाप पैसा खर्च झाला. तो मिळवण्यासाठी आणि सर्व काही आपल्या मनासारखे जमा करण्यात कित्येक वर्षे निघून गेली.

अखेरीस त्याला हवे होते तसे सर्व काही जमून आले. मोठ्या समाधानाने आपली श्रांत दृष्टी त्यावर फिरवून तो चित्र काढण्यासाठी सज्ज झाला. पण सुरुवात केल्यावर त्याच्या लक्षात आले की, सारे काही सर्वोत्कृष्ट मिळवण्याच्या हट्टापायी एवढी वर्षे निघून गेली होती की, त्याच्या मनात होते तसे चित्र काढण्याची शक्तीच वयोवृद्ध झाल्यामुळे त्याच्या हातात राहिलेली नव्हती.

जे त्या चित्रकाराच्या बाबतीत घडले तसे कोणत्याही क्षेत्रातील महत्त्वाकांक्षी आणि कार्यक्षम व्यक्तीच्या आयुष्यात घडू शकते. प्रत्येकाचे यशाचे मोजमाप आणि त्याविषयीच्या कल्पना वेगळ्या असू शकतात. यशाच्या प्राप्तीमुळे लाभणाऱ्या अत्युच्च सुखाच्या काल्पनिक ध्यासापाठी ते अथकपणे धावत सुटलेले असतात. दुर्दैवाने तसे यश लाभले नाही, तर उरी फुटून सोन्यासारख्या आयुष्याची माती करून घेत हाती असलेले गमावून वैफल्यग्रस्त झालेली उदाहरणे काही कमी नाहीत. असे होण्यापेक्षा प्रामाणिकपणे प्रयत्न करून हवे ते पदरात पडले नाही, तरीही जे हाती आहे, त्याचा सर्वोत्कृष्ट आविष्कार करणे केव्हाही योग्य ठरू शकेल. त्यातून जीवघेणे वैफल्य तर येणार नाहीच; उलट कर्तव्यपूर्तीचा, कार्यसाफल्याचा आनंद आणि समाधानलाभू शकेल.

- डॉ. प्रमिला जरग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing latest article 9
Browse Latest Browse All 47

Trending Articles