Quantcast
Viewing latest article 11
Browse Latest Browse All 47

नवनिर्माण

कोणत्याही क्षेत्रात उत्तम यश प्राप्त करून घ्यायचे असेल, तर प्रचंड कष्ट आणि सातत्याची आवश्यकता असते. पण आताचा जमाना 'इन्स्टंट'चा आहे. इन्स्टंट फूडप्रमाणे सौंदर्य, यश, पैसा सारंच कसं ताबडतोब, त्यात हात घालता हाती पडावे असं वाटत असतं, असं आढळून येतं. पण समाजात उत्कृष्ट यश मिळवलेल्या व्यक्ती पाहिल्या, विशेषत: त्या कलेच्या किंवा क्रीडा क्षेत्रातल्या असल्या तर त्यांना लाभणारी प्रसिद्धी आणि मिळणारा पैसा तेवढा दिसतो. त्याआधी त्यांनी त्या विषयांची मूलभूत तत्त्वे समजून घेऊन त्या विषयीचा पाया पक्का केलेला असतो. त्या भक्कम पायावर वर्षानुवर्षे कष्ट केलेले असतात. त्याच तपश्चर्येच्या बळावर त्यांच्या यशाची इमारत उभी राहिलेली असते, हे लक्षात घेणे महत्त्वाचे असते. निसर्गातही असेच अनुभवाला येते. बी लावल्यावर त्याला फुले, फळे लागलीच मिळत नाहीत. यावरून एक कथा आठवली.

एका मुलाला त्याच्या आजोबांनी एक रोप दिले. ते लावण्यासाठी कुंडी, माती सारे आणले. त्यात ते रोप लावले. 'आता तू याला रोज पाणी घालायचं. म्हणजे काही दिवसांनी त्याची मुळं मातीत चांगली रुजतील. मग त्याला छान फळं, फुलं येतील.' आजोबांनी समजावून सांगितले. त्यानंतर ते अधूनमधून चौकशी करायचे. 'अरे, नियमितपणे पाणी घालतोस ना?' असे विचारायचे. 'होय तर' नातू म्हणायचा. असेच काही दिवस गेले. एके दिवशी नातवाने तक्रार केली की, 'मी रोज न चुकता पाणी घालतो. शिवाय त्याची पाहणी करतो, तरीही ते वाढत नाही. उलट वाळत चाललंय. आजोबांना आश्चर्य वाटले. ते स्वत: पाहायला गेले, तर झाड खरंच वाळलेलं दिसलं. कुंडीतली माती विस्कळीत झालेली दिसली. त्यांनी हात लावून पाहिले तर ते मुळासकट हातात आले.' 'अरे याची मुळंच वाढलेली नाहीत तर झाड कसं वाढणार?' 'तेच तर म्हणतोय मी,' नातू म्हणाला, 'ती मुळं वाढतच नव्हती. मी बघत होतो की रोज उपटून किती वाढलीत ते.' हे बोल ऐकून आजोबा हतबुद्ध होऊन गेले. तरीही स्वत:ला सावरत म्हणाले, 'अरे, मुळं काही अशी एका दिवसात नाहीत रुजत. ही मुळं म्हणजे झाडाचा पाया आहे. तो आधी घट्ट रुजावा लागतो. तेव्हा त्याच्यावर झाड भक्कमपणे उभं राहू शकतं.'

खरेच, कोणतीही निर्मिती ही एक प्रक्रिया असते. त्यातल्या प्रत्येक टप्प्यासाठी आवश्यक असलेला वेळ द्यावाच लागतो. धीर धरावा लागतो. तेव्हा त्याचे सुंदर फळ हाती पडते. पुनर्निर्मिती किंवा नवनिर्माणासाठी सुद्धा काही काळ थांबावे लागते. वसंत ऋतूत नवी पालवी फुटण्यापूर्वी शिशिरात पानगळ होते. झाडांनासुद्धा आपल्या हिरवेपणापासून ‌विश्रांती घ्यावी लागते. मोराचा नवा पिसारा येण्यापूर्वी जुना पिसारा झडावा लागतो. असेच माणसाच्या कारकीर्दीतसुद्धा उतार-चढाव येतात. त्यांना धीराने सामोरे कसे जावे हेसुद्धा निसर्ग आपल्याला अनेक परीने दाखवत असतो. त्यापासून बोध घेण्याची इच्छा आणि सवड मात्र हवी.

- डॉ. प्रमिला जरग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing latest article 11
Browse Latest Browse All 47

Trending Articles